दप्तरमुक्त शाळा

शनिवारची दप्तरमुक्त शाळा.

स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड

आज शनिवार अर्थात दप्तरमुक्त शाळा. सर्व मुले वेळेच्या अगोदर हजर होते. आज मुलांना घरून येतांना सायकलचे टायर घेऊन यायला सांगण्यात आले होते. त्यामुळे ज्यांच्या घरी होते त्यांनी सोबत आणले होते. टायर बाजूला ठेवण्याची सूचना देण्यात आली. मुलांचे सारे लक्ष त्या टायर कडेच जात होते. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, जो दिनांक तो पाढा, सुविचार, दिनविशेष, प्रार्थना, समूहगीत, प्रश्नमंजुषा आणि पसायदानाने परिपाठ पूर्ण झाले. मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. परिपाठ संपल्यावर सर्व मुलांना गोलाकार मध्ये बसविण्यात आले. इयत्ता पहिलीची अग्गोबाई कविता कृतीयुक्त मुलांकडून करवून घेण्यात आले. दुसरी वर्गातील गवताचं पातं हे ही गीत कृतीयुक्त घेण्यात आले. पडघमवरती टिपरी पडली ही तिसरीची कविता मुलांनी छान पद्धतीने करून दाखविली. इयत्ता चौथ्या वर्गातील मुलांनी धरतीची आम्ही लेकरं छान आवाजात गाऊन दाखविले. त्यानंतर मुलांची उत्सुकता अधिक न ताणता टायर हातात घेण्यात आले. मुले आणि मुली मिळून टायरचे विविध खेळ खेळण्यात आले. त्यातल्या त्यात टायरची आगगाडी मुलांना खूपच आवडली. तितक्यात वरुण राजा बरसण्यास सुरुवात झाला. नाईलाजास्तव वर्गात जावे लागले. वर्गात गेल्यावर स्व - परिचय नावाचा खेळ घेण्यात आला ज्यात मुलांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची ओळख करून दिले. त्यानंतर विचारा तुम्ही अन सांगतो आम्ही हा उपक्रम घेण्यात आला. ज्यात प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकवलेल्या भागावर प्रश्न तयार करून मुलांना विचारायचे आणि मुलांनीच त्याचे उत्तर द्यायचे. अश्या प्रकारे आजचा दप्तरमुक्त शाळा संपन्न झाली. मुलांनी देखील खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Comments